Saturday, December 1, 2007

"भारत माझा देश आहे"..

सरळ काटकोनात हात
शाळेत बोबड्या आवाजात
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

समज आली - आणखी जोशात ..
करून अगदी ताठ हात..
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

शाळा सुटली.. तशी प्रतिज्ञा..

विसरतो..."भारत माझा देश आहे"

आम्ही आता मल्टिपलेक्समधे सिनेमा पाहतो
पॉपकॉर्न ठेवून बाजूला राष्ट्रगीताला उभे राहतो
राष्ट्रगीत ते पाहताना दाटून येते देशभक्ती
मुलानाही मग करतो ताठ उभ राहायची सक्ती
राष्ट्रगीत संपते.. तसा ताठ कणा मोडतो..
रिलॅक्सिंग खुर्चीत आम्ही अस्ताव्यस्त पसरतो..

विसरतो .."भारत माझा देश आहे"

'बॉर्डर' सिनेमा पाहून राष्ट्रप्रेम उफाळते
धमण्या नसा-नसातून रक्तरक्त उसळते
सीमेच्या सैनिकाला मन सलामसुद्धा करते
धारतीर्थी पडले जे त्यानाही मन स्मरते
सिनेमा संपतो.. सैनिकाची आठवण मग मनाला कुठली होते
आणि धमन्या नसातून वाहणारे रक्त पुन्हा बर्फासारखे थिजते


विसरतो "भारत माझा देश आहे"

भारत पाक मॅच म्हणजे देश भक्तीचे भरते
सचिन शोएबची जुगलबंदी मस्त पैकी रंगते
फाळणीची आठवण पुन्हा मनात दाटते
जिंकणे न्हवे फक्त, त्यांची हार महत्वाची असते
मॅच संपते.. हरल्यावर देशभक्तीचा दिवा विझतो
दोन शिव्या हासडून मग जो तो वाटेला लागतो
विसरतो.. "भारत माझा देश आहे"..

स्वाभिमान ..राष्ट्र प्रेम जागवायला असे घडावे लागतात प्रसंग
तेव्हाच फक्त दिसतात आम्हाला आमच्या तिरंग्यातले रंग ..

[blue]
क्षणभरच आम्ही देशप्रेमाला लागतो..
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिन आम्ही
पब्लिक हॉलिडे म्हणून लक्षात ठेवतो ..

विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे"
विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे" ..

No comments:

Post a Comment