Saturday, December 1, 2007

द्रौपदीचा धावा

थांब थांब रे दु:शासना
माझा सोडी रे कचपाश
स्व:हस्ते तू लेखीशी का
तुझ्या कुळाचा नाश

द्रौपदी मी सती पतिव्रता
भ्रात्यांची तव भार्या
कूलवधु भारत वंशाची
चारित्र्यवान मी आर्या

कवड्यांचा सारीपाट मांडला
दुर्योधना शकुनीची सोबत
पणास लाविली पांचाली
कवडीची केली किंमत

भरसभेत बसले हतबल सारे
कुणी न राहिला वाली
मम रक्षणाची शपथ घेतली
त्यांची मानही खाली

भीष्म पितामह, पिता धृतराष्ट्र
द्रोण गुरू.. अन् कृपाचार्य..
मूक नि:श्‍चल बसले सारे
खचत चालले माझे धैर्य

याची देही याची डोळा
काय पहाते आज
भरसभेत ह्या निराधार मी
कशी वाचवू लाज

डोळ्यासमोर दाटूनी येई
काळा कुटट अंधार
दुभंगे धरती पायाखाली
आकाशी हाहा:कार

शेवटली आस अखेरचा श्वास
ओठांवर येई शेवटले नाव
नसे इथे तरी विश्वास परी
मजसाठी हरी घेईल धाव

सरली सारी भयभीती
उरले ना काही प्रश्न
एकच आता ओठावरती...

हे कृष्ण ..
.
हे कृष्ण ..
.
हे कृष्ण....!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment