Saturday, January 12, 2008

चालतच राहा...पण...

मुलगी वर्षाची झाली
माझं बोट सोडून चालू लागली..
एक एक पाऊल टाकू लागली..
म्हटलं बाळे .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल..
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगी सोळा वर्षाची झाली..
हा हा म्हणता वयात आली..
शाळेच बालपण सोडून
कॉलेज कुमारी झाली..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
प्रत्येक नजर पारखून घे..
प्रत्येक स्पर्श चाचपून घे..
.
स्वत:च जपायचं स्वत:च पावित्र्य..
काचेसम जपायचं स्वत:च चारित्र्य..
कारण
अडखळणं धडपडणं
आता मानवणार नाही..
न भरणा-या जखमेचा व्रण
तुला सोसवणार नाही..
.
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
.
.
.
.
मुलगा वर्षाचा झाला
माझं बोट सोडून चालू लागला..
एक एक पाऊल टाकू लागला..
म्हटलं बाळा .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा..
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल
राजा .. थांबू नकोस.. चालतच राहा...
राजा.. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगा सोळा वर्षांचा झाला..
हा हा म्हणता वयात आला..
शाळेतच बालपण सोडलं होतं..
कॉलेज कुमार होताच नव्याने तरुण झाला..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
नजरेत स्वत:च्याच घसरू नकोस ..
स्पर्शाने घृणा पसरू नकोस..
.
प्रत्येकाचं जपशील जर पावित्र्य..
निष्कलंक राहिल तुझंही चारित्र्य..
कारण
अडखळेल.. कोणी पडेल जर तुझ्यामुळे
तुझं तुलाही मग सावरता येणार नाही..
न भरणा-या जखमेचे व्रण देऊ नकोस हं कुणाला
तुझी चूक मग तुलाच सुधरणार नाही..
.
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment