Monday, January 21, 2008

आई होण्या आधी ......

आई.....मला तुला काही सांगायचय..
मी सांगितलेलं तुला कळलं की नाही..
ते तुझ्या डोळ्यात वाचायचय
तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून
तुला जीवापाड जपायचय..
तुझ्या कुशीत शिरून स्वत:ला विसरायचय
तुझ्या असंख्य ऋ णांचं ओझं खांद्यावरुन मिरवायचय
आणि ते कधीच फेडता येणार नाही म्हणून स्वत:ला लाजवायचय..
जगातलं सारं सुख तुझ्या पायाशी लोळवायचय
तुला समाधानाने हसताना पुन्हा पुन्हा पाहायचय
तुझ्याच साठी शब्दांना काव्यात बांधायचय
आणि हे काव्यपुष्प तुझ्या चरणी अर्पायचय
देवा आधी तुझ्यापुढे नतमस्तक व्हायचय
तुझ्या मनातल्या स्वप्नांना सप्त रंगात रंगवायचय
तुला खरं नाही वाटणार कदाचित
पण तुझ्यासाठी खूप खूप काही करायचय..

विश्वास ठेव आई..
जरी संसारात पडले आणि पतिप्रेमात गुंतले..
नोकरीत अडकले आणि जगरहाटीत मिसळले..
तरी मी तुझीच तुझ्याच कुशीत अंकुरले..
तुझ्या मायेने लाडावले.. तुझ्या सात्विक आहाराने दृढ झाले
तुझ्या धाकात वाढले ..तुझ्या संस्कारात सुसं स्कृत झाले
तुझ्या पोटी जन्म घेऊन अगदी धन्य धन्य झाले..
.
तू खूप काही दिलस.. तरी आज पुन्हा तुझ्याकडे मागायचय
तू चालवलेलं हे मातृत्वाचं व्रत मलाही आता चालवायचय...
म्हणुनच आई.. आई होण्या आधी तुझ्या आशीर्वादाला वाकायचाय..

.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

1 comment: