Monday, January 21, 2008

"पती परमेश्वर.. ?"

.
लग्नानंतर नव-याला जेव्हा
नावाने मारली हाक
बाया बापड्यानी सासरच्या
मुरडले तेव्हा नाक

शिकवले काही नाही म्हणे
हिला आईच्या घरी
नवराही बायको अशी
चालवून घेतो बरी..?

माहेरच्या संस्कारांपुढे
पडलं होतं प्रश्न चिन्ह..??
ऐकून ते सारे आरोप
मन झालं होतं सुन्न

काही झालं तरी मला मात्र
अजिबात नव्हते झुकायचे
सखा-प्रियकर झालेल्याला
नवरा नव्हते बनवायचे

एक काकू म्हणाली मला
पती असतो ग परमेश्वर..
एकेरीचा उल्लेख करताना
थोडातरी विचार कर

ठीक म्हटलं.. मान्य काकू..
नवरा माझा देव आहे..
देवाचाही उच्चार पण
एकेरीच ना सदैव आहे..?

तेव्हापासून काकू माझ्याशी
थोडं अंतर ठेवूनच वागत असतात
"श्रीधर"पंताना मात्र "श्री" च म्हणत
काकू म्हणे हल्ली लाजत असतात...
.
.
.
.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

No comments:

Post a Comment