Saturday, March 14, 2009

पुन्हा सांजवेळी..

पुन्हा सांजवेळी
क्षितिजी सूर्य मावळत होता
आपले तेजबाहू
दशदिशांतून कवळत होता

रुंजी घालत सभोवती
त्या तेजोवलया विनविते
ये काकुळतीला ती धरती
पुन्हा पुन्हा ती मनविते

ही कातरवेळ,
जीवा लागे हूरहूर
दाटते दाहिदिशा
एक काहूर काहूर

आज अवसेची रात
चांदण्यांची साथ नाही
तुझ्यासवे साजरी
अशी एक रात नाही

बाहुपाशातून का रे
झाले अशी मी दूर
पाखरांचेही लोपले रे
ते गोड गोड सूर

झाडांपानांतून इशारे
मेघांनी अडवेन मी वाट
बघ धरला हात तुझा
सागराची होऊन मी लाट
पाहून धरेचा तो आवेश
निमिष एक सूर्यही गडबडला..
काय करावे बरे आता
आपल्या मनाशीच बडबडला
नको नको ग अडवू वाट
नको मोडूस माझी वहिवाट
निज तूही रात प्रहर
हा आलोच मी, होताच पहाट

तिमिराला भितो मी
वाढला तो -जातो मी
समुद्रस्नान घेतो मी
भल्या पहाटे येतो मी

आज नाही चांदणी
पहा सोबत माझी संधीप्रभा
नसेन जरी समीप तुझ्या
असेल परी माझी आभा
जाताजाता अलगद त्याने
सहस्त्रबाहुंनी तिज कवटाळले
आसवांचे थेंब दोन
अथांग सागरी त्या ढाळले

नित्यप्रमाणे भुलली ती
तेजात अशी झुलली ती
मिठीत विसरे देहभान
सांजवेळी अशी खुलली ती

क्षणात होई तो दिसेनासा
पाण्यात असा विरघळला
रक्तिमा तिच्या गालावरला
क्षितिजरेघेवर ओघळला

सौ. अनुराधा म्हापणकर

2 comments: