Thursday, November 29, 2007

उर्मिलेची व्यथा..

कशी सांगू माझ्या मनीची व्यथा
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

भरजरी हे शालू, रेशमी हे शेले
मखमालीची शय्या, अलगद मजला झेले
तरी जरीची टोचे तार, शेल्यात खुपतो काटा
शय्येची मृदू मखमलही बोचू लागली आता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

दागदागिने सोनेरी, रत्नजडीत हे दिव्य
ऐश्वर्याची सावली, प्रासाद उंच हे भव्य
भार दागिन्यांचा मज येई न सोसता..
खुजे वाटते सारे ..महाल होईल रिता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

जरी जानकीच्या भाळी लेखीला वनवास
प्रभू श्रीरामांचा तिला, परी घडेल सहवास
काट्यातुन मग अनवाणीही येईल चालता
थंडी वारे पाऊस सारे येईल मग झेलता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

घोट विषाचा मग मी का प्यावा
माझ्याच नशिबी हा विरह का यावा
चौदा वर्षे -कधी होईल चौदा युगाची सांगता
की सम्पेन मीच आधी वाट पाहता पाहता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

सती जानकी -श्री रामांची सोबत
प्रभूसेवेचे घेतले तुम्ही व्रत
वचनबद्ध तशी चरणी तुमच्या असे ही पतिव्रता
नाही अडवत..जाऊ सोबत ..आपणही उभयता
बोलते इतकेच- सोडूनि जाऊ नका नाथा

1 comment:

  1. Kavita avadlya. Why donot U write articles/lekh etc. also?

    ReplyDelete