Sunday, November 18, 2007

स्मशान मी..

स्मशान.. मी..

इथेच संपला अनेकांचा इहलोकीचा प्रवास..
इथेच घेतला कित्येक शरिरानी शेवटला श्वास..

स्मशान शांतता इथे..जळणारी इथे अचेतन शवे..
आणि सभोवताली अचेतन भावनांचे.. माणसांचे थवे..

अग्नी देइपर्यंत पाझरणारे डोळे ..भिजणारे रुमाल..
नक्राश्रु गाळणारे लोक इथे.. आणि भिजणारे गाल..

चिता भड़कताच मात्र प्रत्येकालाच पळण्याची घाई..
आधाराचा हात जो तो हलकेच काढून घेई..

अग्नी देणा-याला सोबत म्हणुन कुणीच उरत नसतं..
आपलं आपल्यालाच सावरायचय..त्याला कळून चुकतं..

माझ्याही भिंतीनी कधी केलं होतं इथे रुदन..
जळणा-या शवाला पाहून केलं होतं आक्रंदन..

इथे येणा-या शवावर ढाळीले होते अश्रु..
यात्रेवर निघताना मी दिला निरोप साश्रु..

आता मीही निर्जीव.. कोरडा.. अलिकडे संवेदानाच मेल्यात..
इथेच समोरच्या चितेवर मी स्वत:च त्या जाळल्यात..

वाटतं ..
बरं झालं मेलेल्याच्याही मरुन जातात सा-या संवेदना ..
नाहीतर..
आपल्याच अंत:यात्रेत भोगल्या असत्या मरणप्राय यातना

1 comment:

  1. का हो अश्या यातनामय कविता ?

    ReplyDelete