Monday, November 24, 2008

बिनअर्थाचे काही शब्द

बिनअर्थाचे काही शब्द
माझ्याकडे आले एकदा
’मला कवितेत घे’ म्हणत
सा-यांनी लावला तगादा

कधी नव्हे ते स्पष्ट बोलले
म्हटलं-अज्जिबात नाही जमणार
निरर्थक बिनबुडाची कविता
मी कध्धी कध्धी नाही करणार

चिडले - रुसले- माझ्यावर
अगदी फुरगटूनच बसले
त्यातले काही शब्द तर
हट्टाने पेटूनच उठले

म्हणाले - बघ विचार कर
वापर तुझी सद्सदविवेक बुद्धी
नाहीतरी तुझ्या कवितांची
अलिकडे फार वाढलीय रद्दी

"कोंबडी पळाली लंगडी घालून"
"ढिपाडी ढीपांग"- ऐकलंस ना
निरर्थक शब्दांचेही होते गाणे
आणि त्यातही असते भावना

गीतकार होणे गाणे लिहिणे
तुला कध्धीच नाही जमणार
आयुष्यभर म्हणे फक्त फक्त
तू "कविता"च करत रहाणार..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. खरंय,
    पण हे दोन्ही वेगळे प्रांत आहेत. एक चांगला आणि दुसरा वाईट असं कधीच नसतं कलेमधे.
    तुमच्यावर प्रसन्न असणार्‍या प्रतिभा-देवीला प्रणाम.

    उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete