Tuesday, November 6, 2007

चर्चगेट - विरार लोकल..

लोकलच्या गर्दीत एकदा माझा हातच हरवला..
खूप शोधला तेव्हा लांब कुठे - पुसटसा दिसला..

वरच्या कडीला दोन हातांबरोबर लोंबकळत होता..
नखांना त्याच्या काल मी लावलेल्या पेंट्चा कलर होता..

पण हाय रे देवा..! तो माझा हातच नव्हता ...
हलवून खूप पाहिला, तरी हलतच नव्हता..

उतरायची वेळ झाली तरी हात काही मिळेना..
कुठे शोधू ..कशी शोधू.. काही काही कळेना..

शेजारणीला म्हटलं - हात माझा शोधून दे..
ती म्हणे वैतागून - माझा पाय तरी मिळू दे..

तिची बिचारीचीच मला कीव आली ..
म्हटलं .. काय ही परिस्थिती झाली..

हाताशिवाय मी उतरेन तरी खाली..
पायाशिवाय तर ही अगदी अपंगच झाली ..

तेवढ्यात पायावर पडला पाय.. मी म्हटलं  ..
बघ बाई.. तुझाच की काय..?

ती म्हणाली .. खूप जोरात का पडला?
मी म्हटलं  - हो..! ती म्हणे- सापडला.. सापडला..

मीही मग अगदी हट्टालाच पेटले ..
सारं बळ एकवटून मग जोरातच हलले..

ती कळवळली - म्हणाली - हाताचं कोपर लागतंय..
हसतच मग म्हटलं मी- माझ्याच हाताचं वाटतंय..

तीही हसली गालात.. स्टेशनही आलं तेवढ्यात..
आणि हातापायासकट आम्ही दोघीही राहिलो आत.. !!

-अनुराधा म्हापणकर
- लोकलपीडित

5 comments: